बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

तू यावे म्हणुनी .......

         माझ्या ऑफिसला जाण्यायेण्याच्या रस्त्यावर स्मशान आहे.आज सकाळी सकाळी तिथे एक चिता धडधडत होती. कोण गेलं होतं, स्त्री कि पुरुष तरुण कि म्हातारा ठाऊक नाही. कधीचाच अग्नी दिलेला असावा सकाळच्या प्रशांत वेळी ज्वाळा चांगल्याच उंच होत्या. थकल्या भागल्या त्या जीवाला वन्ही आपल्या मांडीवर चिरविश्रांती देत होता. मृत्यू कवेत घेऊन निघाला होता निजधामाला. जळती चिता एकाकी सोडून गेलेल्या नातेवाईक, आप्तांची कणव आली आणि मृताच्या साठी समाधान... किती भाग्यशाली आहे हा माणूस! मृत्यूने आपल्या जवळ घेतले आहे याला....
          सकाळ सकाळ यमधर्माच्या पाऊलखुणा पाहून खरं तर सुखावले मी म्हणून हे सारे विचार माझ्या मनात आले. तुम्ही म्हणाल अमंगळाचे दर्शन झाल्यावर कसले सुख होते कुणास ठाऊक? मला सुख आहे ते मृत्यूचे अस्तित्व जाणवून. (कुणाच्या मृत्यूचे सुख वाटावे इतकी निर्मम नाहीये हो मी) मृत्यूचे फार फार आकर्षण आहे मला... कवी म्हणून कल्पना म्हणून नव्हे... माणूस म्हणून. (जीवन दु:खी आहे असेही नव्हे)प्रेयसीला प्रेयासाचे असते तितके आणि  तसे आकर्षण आहे... ओढ आहे... वाटले तर प्रेम आहे...
           एक खूप खूप गोड स्वप्न आहे माझे...'एक सुंदर ओटी, ओवऱ्या आणि मागचे पुढचे मोकळे झाडामाडांनी डवरलेले आंगण असलेले कौलारू घर असावे. दाराच्या पायथ्याशी पहाटेपहाटे प्राजक्त सुगंधाच्या चवऱ्या ढाळत असावा... पहाटवारे मंद वाहत असावे... मखमली गवतावरल्या दवात पाय भिजवत मी धुंद गिरक्या घ्याव्या आणि तोल जाऊन पडण्याच्या आत अगदी अलगत झेलून वारयावर स्वार व्हावा माझा मृत्यू ......'
         आणखीही वाटतं की वाघासारखा रुबाबदार आणि राजेशाही असावा माझा मृत्यू ....तस्साच हिंस्त्र.... सोनाळ्या उन्हात लखलखता देह घेऊन रुबाबात चालणाऱ्या वाघुल्यापेक्षा नखं परजणारा पेटल्या डोळ्यांचा शिकारी वाघ लै म्हंजे लैच आवडतो मला. त्याची भीती वाटत नाही असं नाही...ती वाटतेच पण प्रेम जास्त वाटतं....
        भो मृत्यू, कसाही ये. कोमल वा विकराळ.... तुझी दोनही रूपं भारी आवडतात मला... मी खूप मणजे खूप आसुसून वाट पाहते आहे तुझी....
         कॉलेजच्या १ल्या २या वर्षी आमचे सचिन प्रवीण म्हणायचे," कौमुदी तुझ्या डोळ्यात वाट दिसते गं" ..तेव्हा हे सांगताच येत  नव्हतं मला ... सुरवातीचं अपयश पाहून डिप्रेशन आलंय म्हणाले असते सारे .. आताही काही खूप यश पाहिलंय असं नव्हे ...अवघड वाटा सोप्या वाटतायेत इतकंच. पण म्हणून वाटत असलेली आंतरिक ओढ कमी झालीये असं मुळीच नाही ....दिवसागणिक ती आपली वाढतेच आहे एव्हढे मात्र खरं. सरणारा एकेक दिवस मला जणू मैलाचं अंतर कपात माझ्या हृदिस्थाकडे घेऊन जातोय असं वाटतं.....त्याची ओढ आहे म्हणूनच जगण्याचा एकेक क्षण enjoy करते मी....मुक्त मुक्त होऊन भेटायचे म्हणून ज्या क्षणी ज्या वेगाने जागून घेता येते ते घेते. तुकोबा म्हणतात  ते  खरेच  खरे  आहे  "मरणाचे  स्मरण  असावे" ....
खरेच  असावे ...
तू  यावे  म्हणुनी
पायघड्या  जगण्याच्या
नाही  मागे  उरणे
सोस  पुरव  सारण्याचा
डोळे  निवून  जाती
उशीर  तुझ्या  दिसण्याचा
चेतवला  तू  वन्ही
हा  गुन्हा  का  पतंगाचा
वर्णनाने  भारावले  आहे हे  खरेच  पण  त्याहूनही  काळाच्या  दूर  असण्याने  भारावले  आहे....  Thee Godess of death come soon....I'm waiting for you....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: