कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २० जानेवारी, २०१८

आई

पान थरथरे शिशिरी
मला भीती गं वाटते
ससा भेदरतो बाई
मनी काळोखी दाटते

आई आई म्हणतांना
भान वादळाला येते
हात चाचपती तुला
मन रात्रपाळी करे

माझं झाड तुझी मूळं
तुझ्या आधाराला जिणं
हासू बिल्लोरी गालात
तुझ्या पदराचं देणं

देह शिणला चिणला
घट्टे हाताला पडले
थेंब सुखाचे डोळ्यात
खळे चंद्राला जडले

तुझ्या उशीत कुशीत
दाणे बहराला आले
पानं पिवळी पडली
धरा विसावा मागते

पुरे पडलो का आई
धुके उरात दाटते
खरे आनंदाचे कण
का गं ओटीत सांडले?

सुरकुत्या हासतात
आई डोळ्यांनी बोलते
पाखरांनो चिमण्यांनो
उडा दूर देशाकडे

तुझ्या डोळ्यांत पाहीन
धन सुखाचे उफाडे
तुझ्या सुखी माझे सुख
हेच बाप्पाला साकडे

हेच सांगते मी आई
आकाशातल्या बापाला
माझा जीव तुझ्या जीवी
सदा सदाचा राहावा

                           - कौमुदी






शुक्रवार, २९ जून, २०१२

पाऊस

मी वळून तुला सामोरी गेले नाही 
बाहू फैलावून मी तुला कवेतही घेतले नाही
मन तुकवून केवळ तुझे अघमर्षण मी झेलत राहिले 
शोधात राहिले ओलेपणापूर्वीचा  कोरडा स्पर्श 
मातीचे कितीतरी थर कोरत 
बुजऱ्या आवेगाने मी भिजत राहिले वर्षावात 
आणि अलिप्तप णाच्या  चिल खताने बचाव करत राहिले 


तू हलवून सोडलेस मला आणि 
मी तुला स्थिरतेत शोधात राहिले 
तू हवा असून नकोसा 
नको असून हवासा 
तू पाऊस वर झंझावात होऊन 
कोसळलास तडातडा 
मी द्विधेत हि चिंब भिजून घरात शिरले 
खिडकी बंद करण्याचे आणि उघडण्याचेही 
धैर्य माझ्यात उरले नाही. 
-कौमुदी. 

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१२

चेहरा


आताशा माला माझाच चेहरा 
पहावासा वाटत नाही.
आरशातून कितीतरी नजरांचे व्रण
. . . टोचत राहतात.
ओळखीचे अनोळखी कित्येक चेहरे 
ओळखू येतात आता . . . 
"त्या" चेहऱ्यातून
निस्वार्थाचे हसू खेळवले आहे 
कि गेले आहेत किती पुराचे अश्रू !?
तद्दन बेरकीपणा लपलेला . . .
"तो" चेहरा आता परकाच आहे 
. . . . माझ्यासाठी 
                     -कौमुदी.

परका


खंत आहे,
मला नाही ओळखता आला 
तुझा आपले-तुपलेपणा. .
ठाऊक . .
तू परकाच आहेस माझ्यासाठी 
मग हि आगळी रहस्ये 
कशी उलगडली तुला?
मी मनाचा मोर तुझ्या हाती  देऊन 
मयूराक्षी झालेय खरी  
पण मयुरपंख होण्याचे  
नशीब नाहीच माझे  
असेल तुझ्या जगण्याने
माझ्या काळजाचा ठाव घेतलेला 
म्हणून जखम तूच बांधावी 
हा न्याय कुठे?
तुला आपलेपणाचा उमाळा यावा 
हा खरा हृदरोग माझा 
तुझ्या दयेने तुला 
खरेच. . परका करून टाकले 
कौमुदी.

गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

नको. . .


मी डोळे मिटून घेते मी घेते झाकून चेहरा
तुज कधीच नको कळाया ह्या भाव मनाचा गहिरा

पाऊल कोरले द्वारी मज कळले देखील नाही
मन कधी तुझ्या ओढीने ओलांडून गेले उंबरा

मन कुब्जा शबरी झाले तुज मागाया रामा
शपथ तुझ्या राधेची ना भाव मनी रे दुसरा

मी कसे तुला संवादू मज काही काही कळेना
मौनाला केवळ लाभे प्रितीचा चेहरा हसरा

मी दूर बसावे कोठे नि मुक्त तुला निरखावे
मी तुला भजावे चोरून ना पडो कुणाच्या नजरा

तुज काही नको कळाया मम डोळा येते पाणी
तू बंध तोडशी सारे जगण्यातून जाईल वारा

मी तुला कथावी गुपिते तू गुपिते म्हणुनी घ्यावी
तू मला कथावे काही ना अर्थ सुखाचा दुसरा

ना शब्द तुला समजावे मी मौन तुझे ऐकावे
संवादकौमुदी व्हावे नि अर्थ असावा गहिरा
-कौमुदी.

मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

ऐसे मिटून जाऊ. . .

ऐसे मिटून जाऊ भृन्गास आत घेऊ
कोण्या जळातळाचा रे चल थांग लावू

कमला 
मनास पाहू चल पाशबद्ध होऊ 
कोणी धरू शकेना ऐसे उडुनी जाऊ

चल रे अंत होऊ सांगून हृदगताला
निघूया चल प्रवासा थोडे फिरून येऊ

मी का तुला स्मरावे माझे मला कळेना
थोडा परस्परांचा रे ढवळून अंत पाहू

ऐसे नकोस पाहू हृदयास विद्ध करुनी
येणे आणिक जाणे कैसे कशास साहू

आरंभ तूच माझा अन्ता नकोस होऊ
चंद्रकोर नेत्रांची मिटण्या नकोस येऊ
-कौमुदी.

बंदिस्त

मी पुन्हा बंदिस्त कोशी मी पुन्हा घरट्यात माझ्या
नील नभाची मुक्त सीमा कोंडली डोळ्यांत माझ्या

निल्नभी मी मुक्त केले ओल्या जुन्या हळव्या व्रणांना
मुक्तता ओल्या व्रणांची सलतसे हृदयात माझ्या

जा मला दावू नको तू मुक्त पक्षी विहरणारे
पाखरे ओल्या ऋतूंची मोकळी पिंजऱ्यात माझ्या

कौमुदी उद्ध्वस्त झाली पौर्णिमेच्या उन्मुक्त चंद्रा
गंधकोषी राहिला तू नेणत्या अवसेत माझ्या
-कौमुदी.  

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

व्याख्या II

कालबाह्य होण्याइतकं
कणखर असण्यापेक्षा
बदलसापेक्ष लवचिक
असणं चांगलं

बदलांची क्रांती चांगलीच
पण त्याहीपेक्षा चांगली उत्क्रांती
सामावलेलं नाविन्य दिसतही
अन पचतही. . .

उगाचच विरोधाचं टोक
म्हणजे क्रांतीची गोची
शक्तीचा अपव्यय अन
स्वीकाराच्या शक्यतेचा विध्वंस

वेळेचा अपव्यय टाळायचा तर
मात्र एवढं चालणारच
इथं जळतही अन कळतही

तात्पर्य इतकंच
वेग असणं नसणं गौण
काही अंतर कापलं की
नव्या चेहऱ्यामोहऱ्या खालचा
सांगाडा कालबाह्यच.
-कौमुदी.

व्याख्या I


जग पुढारलेलंही  नाही
तू स्वत:ला कमी समजण्या इतकं
आणि मागासलेलंही नाही ते
तुला सुधारणावादी मानण्या इतकं

आत्मशोध घे परंतू
तुझ्या प्रगतीचे मापदंड तूच ठरवू नकोस
जगाच्या मापकांत, मानकांत अन
परीभाषांतही अडकू नकोस

तुझ्या नव्या जगाची व्याख्या बांधणं सोपं नाही
इतकं ते स्वैर मुक्त अनाकलनीय
पण इतकंही  नाही . . .
त्याचा अंदाज बांधणं हीदेखील व्याख्याच की!

तुझे शब्द मांड तू
अगदी कुठल्याही बंधनांशिवाय
आणि तुझं जग . . .
. . . मर्त्यतेशिवाय

आता व्याखेची परिभाषा, संदर्भ
अन अर्थदेखील बदलू दे
कालबाह्यतेला व्याखेत कधीही महत्व नसतं
व्याख्याच कालबाह्य होते कालांतरानं

म्हणूनच पुढारलेलं अन मागासलेलं
आपणच ठरवू नये
संदर्भांच्या कालबाह्यतेवरच
ते कधीकधी अवलंबून असतं.
-कौमुदी.

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०११

'माझे राघव'


मी परिघाला विस्तारुनिया घेते
मी माझ्या कोषी गन्धाळूनिया जाते
मी न्हाते कोण्या अस्तित्वाच्या रंगी
नि पाहते तेव्हा अस्तित्व स्वत:चे नसते

न कळे केव्हा शापित जगणे झाले
मी दु:खाला उ:शाप मानून बसले
मूर्त शिळा असण्याची होण्याआधी
अश्रू माझे 'माझे राघव' झाले
-कौमुदी.

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

रुजवाती

रुजवाती व्हाव्यात म्हणून,
सभा बैठका घेण्याची
माझी पद्धत नाही.
भरीस घालू नका;
गळे कापून "ब्र" ही
उच्चारू देणार नाही
विस्फोटाची वाट; नाही,
नैऋत्येच्या वाऱ्यांचा पाऊसही
दीर्घ भिजत घातलेला . . .
बचनाग आता रुजतोय !
-कौमुदी.

सखे ....

सखे तुझी साथ गं
नाही कळत मला
हातामध्ये हात गं
नाही मिळत मला

कुठे कधी कसं
तुझं मन कळेल गं
तुझ्यासाठी सांग
किती रक्त जळेल गं
साद माझी येते का गं
तुला ऐकायला

दिसरात सखे स्वप्नं
तुझी पाहतो
दिवाणा गं तुझा
कसा राहतो
तगमग माझी सांग
दिसते न तुला

स्वप्नी येतेस जातेस
किती दुष्ट होतेस
रोखून नजर
किती कष्ट देतेस
वेळ का गं इतका
मग जवळ यायला

माझं मन तुला
नाही का कळत
माझ्याविना जीव तुझा
नाही का जळत
कारण काय सखे
अगं इतकं छळायला 

तुझ्यावर प्रेम हा
का गुन्हा आहे माझा
सारखा सारखा कशाला
गं खून हा प्रेमाचा
एकदा तरी भेट ना
उत्तर दे मला

ये ना सखे एकदा
हो पौर्णिमेची रात
एकदातरी चांदण्याची
कर ना बरसात
धुंद होऊ दे गं
फुलव गुलाबाला

तुझी साथ माझी मात
आपली वाट हवी
चालूया नं सोबतीनं
पायवाट नवी
नवा अर्थ दे ना सखे
माझ्या जगण्याला
एकदा तरी ये ना
सखे मला भेटायला
-कौमुदी

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

पुन्हा...

स्वप्नरंगा सोडू नको
तू पुन्हा स्वप्नील हो
क्षितीजावरी तू पुन्हा
क्षितीजामध्ये सामील हो

जा पुन्हा घेऊन ये तू
पौर्णिमेचे चांदणे
चांदण्या रात्री पुन्हा
तू तिथे गाफील हो

वार झेलून यामिनीचे
रक्तवर्णी सूर्य हो
उधळूनी साम्राज्य सारे
रे पुन्हा तू चंद्र हो

आत्मरंगी रंगणारा
तू पुन्हा घननीळ हो
स्वप्नरंगा घेऊनि ये
जा पुन्हा स्वप्नील हो!!!
-कौमुदी.

???


काटे माझ्या मुठीत मिटले
काय करू मी?
पाणी काठांपासून हटले
कशी तरू मी?
क्षितिजाशी नभ विरक्त झाले
कुठले कोंदण?
पाठीवरती घातांचे व्रण
हिरवे गोंदण !
फुलेच द्यावी मला वाटले
काटे रुतले
ओघळले दंव फुलांतुनी
काट्यांत गुंतले
घाव हवे मज हव्यात जखमा
हवीत दु:खे
ओल्या हृदयी पाझरते सुख
रुक्ष सुखांचे गाव फिके

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

अप्राप्य

अप्राप्य तू अप्राप्य मी मलाच रे
कणाकणात शोधिले मी तुला तुझ्यात रे . . .

तू कळे ना कळे वाटले उमजले
हरवले मी मला पाहण्या तुझ्यात रे ...

फुलवली तू फुले मी मूळे हरवली
जिंकिले तू मला उभारण्या उन्हात रे . . .

सावली समजले मृगजळा जीवना
तहानले मी पुन्हा, पुन: पुन्हा तृषार्त रे . . .

गवसुनी हरवले मी मला. . मी तुला . . .
शोधते मी तुला . . . मी मला . . . स्वत:त रे . . .
-कौमुदी.

रात


चंद्र चांदण्यासमेत
नको राहूस झोपेत
रात सरेलच बघ
तुझ्या मिटल्या डोळ्यांत 

रात बेहोष उदेली
मंद धुंद प्रकाशात
रात जाहली गडद
तिच्या मोकळ्या केसांत

चंद्र गेला झाकोळून
काजळल्या आभाळात
रंग सोनेरी स्वप्नांचा
तिच्या मिटल्या डोळ्यांत

 रात जरा काळोखली
राजी जाहला प्रकाश
आभा तिच्या मुखड्याची
राती सूर्व्याची संगत

नको जाऊस जळून
घ्यावी काया उजळून
चंद्रसूर्य ठहरेल
उद्या तिच्या अंकुरात
-कौमुदी

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

परीघ


आत्ममग्नतेचा अख्खा डोह
तळागाळासकट माझा
गाढ गहराईने हरेक लाट
शोधते किनारा
आणि विलीन होते
माझ्याच गढूळलेल्या खळबळीत
लाटांचे अंर्तगोल   फुगवटे
कसे उठले डोहात
आसमंतही डोहाळलेला
तरी आसमंत डोहात उतरले नाही
आणि ...
सुकण्याची वाटही न पाहता
डोहाचा काळोख परिघातून वजा झाला
-कौमुदी

पुनरुत्थान


नगरांचे भग्नावशेष अंधारीत
पुनरुत्थानाच्या अनेक सरी....
....विरून जातात
नवनिर्मितीच्या प्रयत्नांचे वादळ
तुकड्या तुकड्यांच्या धुळींनी शोषून
धरले आहे, थोपवून...
ओळखींच्या अनोळखी गर्दीत
शोधायचे आहे ...
...एक नवं शहर!
                     -कौमुदी.

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११

मी

माझं मूळ शोधायला
हजारो वर्षांमागच्या प्रवासाला
अनेक युगखंडांवर थांबावं लागणार !
मी. आर्य कि द्रविड
शुद्ध? अशुद्ध?
संस्कृत कि रानटी
सवर्ण? शुद्र?
एकाही ज्ञातीच श्रेष्ठत्व नाही,
माझ्या मानबिंदूत.
साऱ्यांचीच सरमिसळ असलेला
वर्णप्रवाह मी ग्रहांच्या उत्पाताप्रमाणे
षंढांच्या नावाने चालणाऱ्या 
स्त्रियांच्या वंशाप्रमाणे
माझं मूळ आणि कुळ वेगवेगळंच.
                                     -कौमुदी.

बुधवार, २ नोव्हेंबर, २०११

आहे ...............

डोळ्यांत आसवांना अजुनी किनार आहे
हृदयात साहिलेला व्रण खोलवार आहे

समर्पित देह सारे तेजाळल्या दिशांना
अंतराळ भरुनी अंधार फार आहे

बुजवू कुण्या मितीने, त्रिमितीय कृष्णविवरे
दंडगोल अंधाराचा ताल खोल फार आहे

जगण्यास अर्थ कुठला आहे अनर्थ भरुनि
पृथिवीस मातीचाही होतोच भर आहे

संकोचली क्षितिजे विस्तारल्या दिशांनी
फाकल्या प्रभेला मुजरा त्रिवार आहे !!