रविवार, २५ डिसेंबर, २०११

I am What I am

तू निघून गेलास तरी कळ उठतेच काळजात  (म्हणूनच त्याला काळीज म्हणत असावेत कदाचित) आहेस तू इथंच रोमारोमातून . . .अजूनही . . . खूप गढलेली असते कामात म्हणून तुझी आठवण होत नाही असं नाही. तुझ्यासाठीच आणि तुझ्यामुळेच तर आयुष्यातलं हरेक काम करते मी . . .
तुला पौर्णिमेत आभाळभर चंद्र पाहायचा होता आणि मी अजूनही अमावस्येतच लुप्त आहे. रात्रीच्या गर्भात जेव्हा पूर्णचंद्र अंकुरेल तेव्हा सारं जग स्वच्छ चांदण्यात न्हाऊन निघेल, त्यासाठीच तर मी सारा कृष्णपक्ष मोजते आहे. . .
अजूनही तुझ्या नावानं तरारतात डोळे आणि दोन आसव गालांवर उतरतात . . . मी त्यांना काळजात जिरवायला शिकले आहे आत्ता आत्ता . . ! आहे लक्षात माझ्या . . . पावसाळी आभाळातला झाकोळलेला चंद्र तुला कधीच आवडत नव्हता.
तू हसू घेऊन आलास आणि आसू होऊन गेलास . . . मी सुखी आहे रे त्या आसवांतसुद्धा. . . पुसत तू नसलास तरी ओघळतो तूच आहेस. . .
तू मला तुला विसरायला सांगून गेलास . . . कशी विसरू तुला? तुला विसरायचं म्हटलं तर माझी जमीन, वरच आभाळ, भोवतालची हवा, चंद्र-सूर्य तारे सारे विसरावे लागतील. मला माझे निश्वासही थांबवावे लागतील . . . देहाला अजूनही तुझ्याच नजरेची झुंबरं लटकताहेत. . इतका प्रकाश आहे . . . मी उजळले आहे. . .
आठवतोय तुला? माझ्या पदरानं मी तुझ्या कपाळावरचा टिपलेला घाम . . . माझा पदर अजूनही ओला. . . तुझ्या अस्तित्वाचा गंध घेऊन कस्तुरीला दरवळ आहे . . . कपाळावर टेकलेले तुझे ओठ हटलेच नाहीत अजून  . . . अजूनही माझ्या केसांवर तुझेच हात फिरताहेत  . . .
खूप भुकेजला होतास तू एकदा . . . माझ्या हाताने तुला घास भरवल्यानंतर तुझी तृप्त नजर . . .  रक्तचंदनाचं काम करते आहे . . .
कानात तुझाच स्वर रुंजी घालतोय आणि आता . . . आता तर तू माझ्याच ओठांनी बोलतो आहेस . . .
तुला विसरायचं म्हणजे हे पंचप्राण टाकावे लागतील . . . बघ ना. . . तू म्हणजे तू आणि मी म्हणजेही तू. तुझ्यातून तुला कसं वजा करता येईल? मी असते तर विसरले असते कदाचित! !
You are a change for me; and it is drastic. Just because, you changed me, I met myself. You "for whom and by whom" I am What I am
Thanks D
कौमुदी.

गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

अग्निसंभवा

मी येत आहे . . .
पुन्हा एकदा चौकटी मोडण्यासाठी . . .
व्याख्यांच्या बदलासाठी rather  अव्याख्य राहण्यासाठी
I am too much unpredictable than the prediction. . .
I am back to "set" an example of "destruction"
किती चोर लुटारू आम्ही अंगाखांद्यावर वागवले
हरेक स्पर्शाने एक नवी जाणीव झाली
आता इतकी जाणीव कि चंदनाच्या साली ओरबाडून पुन्हा एकदा रक्ताळावेसे वाटते
सारे स्पर्श पुसून पुन्हा नव्याने NEW BRAND जाणीव प्रस्थापित करायची आहे . . .
ही तर सुरुवात आहे
वादळांनो... मी येत आहे . . .
त्या पुराण्या भांडणांची ही नवी रुजवात आहे
गाईले दुखडे अनेको  दाविली कवळी तराणी 
सोसल्या दु:खास आता काढिले कांडात आहे . . .
Again,. . . what to write?. . .काही जरी अक्षरबद्ध केले तरी ते बंदिस्त होऊन जाते . . . मुक्ततेच्या पुजाऱ्याने काहीही बांधता कामा नये . . .
-कौमुदी.


नको. . .


मी डोळे मिटून घेते मी घेते झाकून चेहरा
तुज कधीच नको कळाया ह्या भाव मनाचा गहिरा

पाऊल कोरले द्वारी मज कळले देखील नाही
मन कधी तुझ्या ओढीने ओलांडून गेले उंबरा

मन कुब्जा शबरी झाले तुज मागाया रामा
शपथ तुझ्या राधेची ना भाव मनी रे दुसरा

मी कसे तुला संवादू मज काही काही कळेना
मौनाला केवळ लाभे प्रितीचा चेहरा हसरा

मी दूर बसावे कोठे नि मुक्त तुला निरखावे
मी तुला भजावे चोरून ना पडो कुणाच्या नजरा

तुज काही नको कळाया मम डोळा येते पाणी
तू बंध तोडशी सारे जगण्यातून जाईल वारा

मी तुला कथावी गुपिते तू गुपिते म्हणुनी घ्यावी
तू मला कथावे काही ना अर्थ सुखाचा दुसरा

ना शब्द तुला समजावे मी मौन तुझे ऐकावे
संवादकौमुदी व्हावे नि अर्थ असावा गहिरा
-कौमुदी.

मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

ऐसे मिटून जाऊ. . .

ऐसे मिटून जाऊ भृन्गास आत घेऊ
कोण्या जळातळाचा रे चल थांग लावू

कमला 
मनास पाहू चल पाशबद्ध होऊ 
कोणी धरू शकेना ऐसे उडुनी जाऊ

चल रे अंत होऊ सांगून हृदगताला
निघूया चल प्रवासा थोडे फिरून येऊ

मी का तुला स्मरावे माझे मला कळेना
थोडा परस्परांचा रे ढवळून अंत पाहू

ऐसे नकोस पाहू हृदयास विद्ध करुनी
येणे आणिक जाणे कैसे कशास साहू

आरंभ तूच माझा अन्ता नकोस होऊ
चंद्रकोर नेत्रांची मिटण्या नकोस येऊ
-कौमुदी.

बंदिस्त

मी पुन्हा बंदिस्त कोशी मी पुन्हा घरट्यात माझ्या
नील नभाची मुक्त सीमा कोंडली डोळ्यांत माझ्या

निल्नभी मी मुक्त केले ओल्या जुन्या हळव्या व्रणांना
मुक्तता ओल्या व्रणांची सलतसे हृदयात माझ्या

जा मला दावू नको तू मुक्त पक्षी विहरणारे
पाखरे ओल्या ऋतूंची मोकळी पिंजऱ्यात माझ्या

कौमुदी उद्ध्वस्त झाली पौर्णिमेच्या उन्मुक्त चंद्रा
गंधकोषी राहिला तू नेणत्या अवसेत माझ्या
-कौमुदी.  

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

व्याख्या II

कालबाह्य होण्याइतकं
कणखर असण्यापेक्षा
बदलसापेक्ष लवचिक
असणं चांगलं

बदलांची क्रांती चांगलीच
पण त्याहीपेक्षा चांगली उत्क्रांती
सामावलेलं नाविन्य दिसतही
अन पचतही. . .

उगाचच विरोधाचं टोक
म्हणजे क्रांतीची गोची
शक्तीचा अपव्यय अन
स्वीकाराच्या शक्यतेचा विध्वंस

वेळेचा अपव्यय टाळायचा तर
मात्र एवढं चालणारच
इथं जळतही अन कळतही

तात्पर्य इतकंच
वेग असणं नसणं गौण
काही अंतर कापलं की
नव्या चेहऱ्यामोहऱ्या खालचा
सांगाडा कालबाह्यच.
-कौमुदी.

व्याख्या I


जग पुढारलेलंही  नाही
तू स्वत:ला कमी समजण्या इतकं
आणि मागासलेलंही नाही ते
तुला सुधारणावादी मानण्या इतकं

आत्मशोध घे परंतू
तुझ्या प्रगतीचे मापदंड तूच ठरवू नकोस
जगाच्या मापकांत, मानकांत अन
परीभाषांतही अडकू नकोस

तुझ्या नव्या जगाची व्याख्या बांधणं सोपं नाही
इतकं ते स्वैर मुक्त अनाकलनीय
पण इतकंही  नाही . . .
त्याचा अंदाज बांधणं हीदेखील व्याख्याच की!

तुझे शब्द मांड तू
अगदी कुठल्याही बंधनांशिवाय
आणि तुझं जग . . .
. . . मर्त्यतेशिवाय

आता व्याखेची परिभाषा, संदर्भ
अन अर्थदेखील बदलू दे
कालबाह्यतेला व्याखेत कधीही महत्व नसतं
व्याख्याच कालबाह्य होते कालांतरानं

म्हणूनच पुढारलेलं अन मागासलेलं
आपणच ठरवू नये
संदर्भांच्या कालबाह्यतेवरच
ते कधीकधी अवलंबून असतं.
-कौमुदी.

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

स्वगत

एकमेकांना चकवत मागं पुढं जात
तुझी माझी सोबत म्हणजे सुरुवात
मी... तुझ्या झाडामाडात, निळ्या पाण्यात
उमलत्या खळीत भरल्या डोळ्यांत
तुझी बेरीज माझ्या गणितात
तुझे कोन रेषासुद्धा माझ्या मापात
तू  म्हणजे डोह भीती बुडण्याची
नाही अंदाज खोलीचा ...
..... नेहमीच व्युहात, चक्रात कधी मृगजळातसुद्धा.
मी स्पष्ट सरळ ....आयत काटकोन चौकोन
मी साधसं गणित एक अधिक एक दोन
मी म्हणजे झाडं माड निर्विकार निर्भय
तुझी सकाळ दुपार सायंकाळ . . . रोज वेगळा सूर्योदय.
तू आणि मी आग आणि पाणी
गोंधळ आणि गाणी
विभाजनाची प्रक्रिया अन कंसाची जोडणी
तू आणि मी . . . सततचा संघर्ष
positive into negative is equal to neutral
हे तत्व साधसं . . .
तुझा माझा संघर्ष तरच प्रकाश
सोबत सुटलीच . . .  पुरता विनाश
जे होईल ते भोगू आपणच
दोन्ही तुल्यबळ विजयाचं काय?
संघर्षाचं काय? प्रश्न. . .प्रश्न . . . संघर्ष . . .
संघर्षाला उत्तर? . . .!
संघर्ष . . .
-कौमुदी.
माझी एकांकिका "संमुख कोन" यातील काही भाग.........