रविवार, २५ डिसेंबर, २०११

I am What I am

तू निघून गेलास तरी कळ उठतेच काळजात  (म्हणूनच त्याला काळीज म्हणत असावेत कदाचित) आहेस तू इथंच रोमारोमातून . . .अजूनही . . . खूप गढलेली असते कामात म्हणून तुझी आठवण होत नाही असं नाही. तुझ्यासाठीच आणि तुझ्यामुळेच तर आयुष्यातलं हरेक काम करते मी . . .
तुला पौर्णिमेत आभाळभर चंद्र पाहायचा होता आणि मी अजूनही अमावस्येतच लुप्त आहे. रात्रीच्या गर्भात जेव्हा पूर्णचंद्र अंकुरेल तेव्हा सारं जग स्वच्छ चांदण्यात न्हाऊन निघेल, त्यासाठीच तर मी सारा कृष्णपक्ष मोजते आहे. . .
अजूनही तुझ्या नावानं तरारतात डोळे आणि दोन आसव गालांवर उतरतात . . . मी त्यांना काळजात जिरवायला शिकले आहे आत्ता आत्ता . . ! आहे लक्षात माझ्या . . . पावसाळी आभाळातला झाकोळलेला चंद्र तुला कधीच आवडत नव्हता.
तू हसू घेऊन आलास आणि आसू होऊन गेलास . . . मी सुखी आहे रे त्या आसवांतसुद्धा. . . पुसत तू नसलास तरी ओघळतो तूच आहेस. . .
तू मला तुला विसरायला सांगून गेलास . . . कशी विसरू तुला? तुला विसरायचं म्हटलं तर माझी जमीन, वरच आभाळ, भोवतालची हवा, चंद्र-सूर्य तारे सारे विसरावे लागतील. मला माझे निश्वासही थांबवावे लागतील . . . देहाला अजूनही तुझ्याच नजरेची झुंबरं लटकताहेत. . इतका प्रकाश आहे . . . मी उजळले आहे. . .
आठवतोय तुला? माझ्या पदरानं मी तुझ्या कपाळावरचा टिपलेला घाम . . . माझा पदर अजूनही ओला. . . तुझ्या अस्तित्वाचा गंध घेऊन कस्तुरीला दरवळ आहे . . . कपाळावर टेकलेले तुझे ओठ हटलेच नाहीत अजून  . . . अजूनही माझ्या केसांवर तुझेच हात फिरताहेत  . . .
खूप भुकेजला होतास तू एकदा . . . माझ्या हाताने तुला घास भरवल्यानंतर तुझी तृप्त नजर . . .  रक्तचंदनाचं काम करते आहे . . .
कानात तुझाच स्वर रुंजी घालतोय आणि आता . . . आता तर तू माझ्याच ओठांनी बोलतो आहेस . . .
तुला विसरायचं म्हणजे हे पंचप्राण टाकावे लागतील . . . बघ ना. . . तू म्हणजे तू आणि मी म्हणजेही तू. तुझ्यातून तुला कसं वजा करता येईल? मी असते तर विसरले असते कदाचित! !
You are a change for me; and it is drastic. Just because, you changed me, I met myself. You "for whom and by whom" I am What I am
Thanks D
कौमुदी.

गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

अग्निसंभवा

मी येत आहे . . .
पुन्हा एकदा चौकटी मोडण्यासाठी . . .
व्याख्यांच्या बदलासाठी rather  अव्याख्य राहण्यासाठी
I am too much unpredictable than the prediction. . .
I am back to "set" an example of "destruction"
किती चोर लुटारू आम्ही अंगाखांद्यावर वागवले
हरेक स्पर्शाने एक नवी जाणीव झाली
आता इतकी जाणीव कि चंदनाच्या साली ओरबाडून पुन्हा एकदा रक्ताळावेसे वाटते
सारे स्पर्श पुसून पुन्हा नव्याने NEW BRAND जाणीव प्रस्थापित करायची आहे . . .
ही तर सुरुवात आहे
वादळांनो... मी येत आहे . . .
त्या पुराण्या भांडणांची ही नवी रुजवात आहे
गाईले दुखडे अनेको  दाविली कवळी तराणी 
सोसल्या दु:खास आता काढिले कांडात आहे . . .
Again,. . . what to write?. . .काही जरी अक्षरबद्ध केले तरी ते बंदिस्त होऊन जाते . . . मुक्ततेच्या पुजाऱ्याने काहीही बांधता कामा नये . . .
-कौमुदी.


नको. . .


मी डोळे मिटून घेते मी घेते झाकून चेहरा
तुज कधीच नको कळाया ह्या भाव मनाचा गहिरा

पाऊल कोरले द्वारी मज कळले देखील नाही
मन कधी तुझ्या ओढीने ओलांडून गेले उंबरा

मन कुब्जा शबरी झाले तुज मागाया रामा
शपथ तुझ्या राधेची ना भाव मनी रे दुसरा

मी कसे तुला संवादू मज काही काही कळेना
मौनाला केवळ लाभे प्रितीचा चेहरा हसरा

मी दूर बसावे कोठे नि मुक्त तुला निरखावे
मी तुला भजावे चोरून ना पडो कुणाच्या नजरा

तुज काही नको कळाया मम डोळा येते पाणी
तू बंध तोडशी सारे जगण्यातून जाईल वारा

मी तुला कथावी गुपिते तू गुपिते म्हणुनी घ्यावी
तू मला कथावे काही ना अर्थ सुखाचा दुसरा

ना शब्द तुला समजावे मी मौन तुझे ऐकावे
संवादकौमुदी व्हावे नि अर्थ असावा गहिरा
-कौमुदी.

मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

ऐसे मिटून जाऊ. . .

ऐसे मिटून जाऊ भृन्गास आत घेऊ
कोण्या जळातळाचा रे चल थांग लावू

कमला 
मनास पाहू चल पाशबद्ध होऊ 
कोणी धरू शकेना ऐसे उडुनी जाऊ

चल रे अंत होऊ सांगून हृदगताला
निघूया चल प्रवासा थोडे फिरून येऊ

मी का तुला स्मरावे माझे मला कळेना
थोडा परस्परांचा रे ढवळून अंत पाहू

ऐसे नकोस पाहू हृदयास विद्ध करुनी
येणे आणिक जाणे कैसे कशास साहू

आरंभ तूच माझा अन्ता नकोस होऊ
चंद्रकोर नेत्रांची मिटण्या नकोस येऊ
-कौमुदी.

बंदिस्त

मी पुन्हा बंदिस्त कोशी मी पुन्हा घरट्यात माझ्या
नील नभाची मुक्त सीमा कोंडली डोळ्यांत माझ्या

निल्नभी मी मुक्त केले ओल्या जुन्या हळव्या व्रणांना
मुक्तता ओल्या व्रणांची सलतसे हृदयात माझ्या

जा मला दावू नको तू मुक्त पक्षी विहरणारे
पाखरे ओल्या ऋतूंची मोकळी पिंजऱ्यात माझ्या

कौमुदी उद्ध्वस्त झाली पौर्णिमेच्या उन्मुक्त चंद्रा
गंधकोषी राहिला तू नेणत्या अवसेत माझ्या
-कौमुदी.  

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

व्याख्या II

कालबाह्य होण्याइतकं
कणखर असण्यापेक्षा
बदलसापेक्ष लवचिक
असणं चांगलं

बदलांची क्रांती चांगलीच
पण त्याहीपेक्षा चांगली उत्क्रांती
सामावलेलं नाविन्य दिसतही
अन पचतही. . .

उगाचच विरोधाचं टोक
म्हणजे क्रांतीची गोची
शक्तीचा अपव्यय अन
स्वीकाराच्या शक्यतेचा विध्वंस

वेळेचा अपव्यय टाळायचा तर
मात्र एवढं चालणारच
इथं जळतही अन कळतही

तात्पर्य इतकंच
वेग असणं नसणं गौण
काही अंतर कापलं की
नव्या चेहऱ्यामोहऱ्या खालचा
सांगाडा कालबाह्यच.
-कौमुदी.

व्याख्या I


जग पुढारलेलंही  नाही
तू स्वत:ला कमी समजण्या इतकं
आणि मागासलेलंही नाही ते
तुला सुधारणावादी मानण्या इतकं

आत्मशोध घे परंतू
तुझ्या प्रगतीचे मापदंड तूच ठरवू नकोस
जगाच्या मापकांत, मानकांत अन
परीभाषांतही अडकू नकोस

तुझ्या नव्या जगाची व्याख्या बांधणं सोपं नाही
इतकं ते स्वैर मुक्त अनाकलनीय
पण इतकंही  नाही . . .
त्याचा अंदाज बांधणं हीदेखील व्याख्याच की!

तुझे शब्द मांड तू
अगदी कुठल्याही बंधनांशिवाय
आणि तुझं जग . . .
. . . मर्त्यतेशिवाय

आता व्याखेची परिभाषा, संदर्भ
अन अर्थदेखील बदलू दे
कालबाह्यतेला व्याखेत कधीही महत्व नसतं
व्याख्याच कालबाह्य होते कालांतरानं

म्हणूनच पुढारलेलं अन मागासलेलं
आपणच ठरवू नये
संदर्भांच्या कालबाह्यतेवरच
ते कधीकधी अवलंबून असतं.
-कौमुदी.

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

स्वगत

एकमेकांना चकवत मागं पुढं जात
तुझी माझी सोबत म्हणजे सुरुवात
मी... तुझ्या झाडामाडात, निळ्या पाण्यात
उमलत्या खळीत भरल्या डोळ्यांत
तुझी बेरीज माझ्या गणितात
तुझे कोन रेषासुद्धा माझ्या मापात
तू  म्हणजे डोह भीती बुडण्याची
नाही अंदाज खोलीचा ...
..... नेहमीच व्युहात, चक्रात कधी मृगजळातसुद्धा.
मी स्पष्ट सरळ ....आयत काटकोन चौकोन
मी साधसं गणित एक अधिक एक दोन
मी म्हणजे झाडं माड निर्विकार निर्भय
तुझी सकाळ दुपार सायंकाळ . . . रोज वेगळा सूर्योदय.
तू आणि मी आग आणि पाणी
गोंधळ आणि गाणी
विभाजनाची प्रक्रिया अन कंसाची जोडणी
तू आणि मी . . . सततचा संघर्ष
positive into negative is equal to neutral
हे तत्व साधसं . . .
तुझा माझा संघर्ष तरच प्रकाश
सोबत सुटलीच . . .  पुरता विनाश
जे होईल ते भोगू आपणच
दोन्ही तुल्यबळ विजयाचं काय?
संघर्षाचं काय? प्रश्न. . .प्रश्न . . . संघर्ष . . .
संघर्षाला उत्तर? . . .!
संघर्ष . . .
-कौमुदी.
माझी एकांकिका "संमुख कोन" यातील काही भाग.........

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०११

'माझे राघव'


मी परिघाला विस्तारुनिया घेते
मी माझ्या कोषी गन्धाळूनिया जाते
मी न्हाते कोण्या अस्तित्वाच्या रंगी
नि पाहते तेव्हा अस्तित्व स्वत:चे नसते

न कळे केव्हा शापित जगणे झाले
मी दु:खाला उ:शाप मानून बसले
मूर्त शिळा असण्याची होण्याआधी
अश्रू माझे 'माझे राघव' झाले
-कौमुदी.

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

रुजवाती

रुजवाती व्हाव्यात म्हणून,
सभा बैठका घेण्याची
माझी पद्धत नाही.
भरीस घालू नका;
गळे कापून "ब्र" ही
उच्चारू देणार नाही
विस्फोटाची वाट; नाही,
नैऋत्येच्या वाऱ्यांचा पाऊसही
दीर्घ भिजत घातलेला . . .
बचनाग आता रुजतोय !
-कौमुदी.

सखे ....

सखे तुझी साथ गं
नाही कळत मला
हातामध्ये हात गं
नाही मिळत मला

कुठे कधी कसं
तुझं मन कळेल गं
तुझ्यासाठी सांग
किती रक्त जळेल गं
साद माझी येते का गं
तुला ऐकायला

दिसरात सखे स्वप्नं
तुझी पाहतो
दिवाणा गं तुझा
कसा राहतो
तगमग माझी सांग
दिसते न तुला

स्वप्नी येतेस जातेस
किती दुष्ट होतेस
रोखून नजर
किती कष्ट देतेस
वेळ का गं इतका
मग जवळ यायला

माझं मन तुला
नाही का कळत
माझ्याविना जीव तुझा
नाही का जळत
कारण काय सखे
अगं इतकं छळायला 

तुझ्यावर प्रेम हा
का गुन्हा आहे माझा
सारखा सारखा कशाला
गं खून हा प्रेमाचा
एकदा तरी भेट ना
उत्तर दे मला

ये ना सखे एकदा
हो पौर्णिमेची रात
एकदातरी चांदण्याची
कर ना बरसात
धुंद होऊ दे गं
फुलव गुलाबाला

तुझी साथ माझी मात
आपली वाट हवी
चालूया नं सोबतीनं
पायवाट नवी
नवा अर्थ दे ना सखे
माझ्या जगण्याला
एकदा तरी ये ना
सखे मला भेटायला
-कौमुदी

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

पुन्हा...

स्वप्नरंगा सोडू नको
तू पुन्हा स्वप्नील हो
क्षितीजावरी तू पुन्हा
क्षितीजामध्ये सामील हो

जा पुन्हा घेऊन ये तू
पौर्णिमेचे चांदणे
चांदण्या रात्री पुन्हा
तू तिथे गाफील हो

वार झेलून यामिनीचे
रक्तवर्णी सूर्य हो
उधळूनी साम्राज्य सारे
रे पुन्हा तू चंद्र हो

आत्मरंगी रंगणारा
तू पुन्हा घननीळ हो
स्वप्नरंगा घेऊनि ये
जा पुन्हा स्वप्नील हो!!!
-कौमुदी.

???


काटे माझ्या मुठीत मिटले
काय करू मी?
पाणी काठांपासून हटले
कशी तरू मी?
क्षितिजाशी नभ विरक्त झाले
कुठले कोंदण?
पाठीवरती घातांचे व्रण
हिरवे गोंदण !
फुलेच द्यावी मला वाटले
काटे रुतले
ओघळले दंव फुलांतुनी
काट्यांत गुंतले
घाव हवे मज हव्यात जखमा
हवीत दु:खे
ओल्या हृदयी पाझरते सुख
रुक्ष सुखांचे गाव फिके

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

अप्राप्य

अप्राप्य तू अप्राप्य मी मलाच रे
कणाकणात शोधिले मी तुला तुझ्यात रे . . .

तू कळे ना कळे वाटले उमजले
हरवले मी मला पाहण्या तुझ्यात रे ...

फुलवली तू फुले मी मूळे हरवली
जिंकिले तू मला उभारण्या उन्हात रे . . .

सावली समजले मृगजळा जीवना
तहानले मी पुन्हा, पुन: पुन्हा तृषार्त रे . . .

गवसुनी हरवले मी मला. . मी तुला . . .
शोधते मी तुला . . . मी मला . . . स्वत:त रे . . .
-कौमुदी.

रात


चंद्र चांदण्यासमेत
नको राहूस झोपेत
रात सरेलच बघ
तुझ्या मिटल्या डोळ्यांत 

रात बेहोष उदेली
मंद धुंद प्रकाशात
रात जाहली गडद
तिच्या मोकळ्या केसांत

चंद्र गेला झाकोळून
काजळल्या आभाळात
रंग सोनेरी स्वप्नांचा
तिच्या मिटल्या डोळ्यांत

 रात जरा काळोखली
राजी जाहला प्रकाश
आभा तिच्या मुखड्याची
राती सूर्व्याची संगत

नको जाऊस जळून
घ्यावी काया उजळून
चंद्रसूर्य ठहरेल
उद्या तिच्या अंकुरात
-कौमुदी

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

परीघ


आत्ममग्नतेचा अख्खा डोह
तळागाळासकट माझा
गाढ गहराईने हरेक लाट
शोधते किनारा
आणि विलीन होते
माझ्याच गढूळलेल्या खळबळीत
लाटांचे अंर्तगोल   फुगवटे
कसे उठले डोहात
आसमंतही डोहाळलेला
तरी आसमंत डोहात उतरले नाही
आणि ...
सुकण्याची वाटही न पाहता
डोहाचा काळोख परिघातून वजा झाला
-कौमुदी

पुनरुत्थान


नगरांचे भग्नावशेष अंधारीत
पुनरुत्थानाच्या अनेक सरी....
....विरून जातात
नवनिर्मितीच्या प्रयत्नांचे वादळ
तुकड्या तुकड्यांच्या धुळींनी शोषून
धरले आहे, थोपवून...
ओळखींच्या अनोळखी गर्दीत
शोधायचे आहे ...
...एक नवं शहर!
                     -कौमुदी.

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११

मी

माझं मूळ शोधायला
हजारो वर्षांमागच्या प्रवासाला
अनेक युगखंडांवर थांबावं लागणार !
मी. आर्य कि द्रविड
शुद्ध? अशुद्ध?
संस्कृत कि रानटी
सवर्ण? शुद्र?
एकाही ज्ञातीच श्रेष्ठत्व नाही,
माझ्या मानबिंदूत.
साऱ्यांचीच सरमिसळ असलेला
वर्णप्रवाह मी ग्रहांच्या उत्पाताप्रमाणे
षंढांच्या नावाने चालणाऱ्या 
स्त्रियांच्या वंशाप्रमाणे
माझं मूळ आणि कुळ वेगवेगळंच.
                                     -कौमुदी.

बुधवार, २ नोव्हेंबर, २०११

आहे ...............

डोळ्यांत आसवांना अजुनी किनार आहे
हृदयात साहिलेला व्रण खोलवार आहे

समर्पित देह सारे तेजाळल्या दिशांना
अंतराळ भरुनी अंधार फार आहे

बुजवू कुण्या मितीने, त्रिमितीय कृष्णविवरे
दंडगोल अंधाराचा ताल खोल फार आहे

जगण्यास अर्थ कुठला आहे अनर्थ भरुनि
पृथिवीस मातीचाही होतोच भर आहे

संकोचली क्षितिजे विस्तारल्या दिशांनी
फाकल्या प्रभेला मुजरा त्रिवार आहे !!

फुलांनो!........

फुलांनो! लक्षात ठेवा
माझ्यामागं  सुगंध
चेतवायचा  आहे, तुम्हाला
अस्तित्वाच्या ठिणग्या पडू देत;
नको नुसता बहार ओला
आकार आणि अर्थ असू देत,
निदान तुमच्या तरी जगण्याला
कुरणावर पायदळी जाण्यापेक्षा
काटे व्हा ...
असू देत एक सल टोचायला
नाही अंग वळणी पडलं सारं
तर थांबवा थोडा वेळ फुलणं
मी येतेच आहे ...
.....पुन्हा जन्माला
                              -कौमुदी

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०११

तू .....

रे तुझ्या जीवनाचे गाणे गाणे व्हावे
डोळ्यांत सारी अश्कांच्या मी गाणे गात भिजावे

सोनसळी हास्याने सारे जग उजळावे
ते हिरवे श्रावण रावे उंच उंच लहरावे

कुण्या बंदिशीने का गीत तुला ठरवावे
मुक्त छंद कविता तू मुक्त मुक्त बहरावे

मी धावे कस्तूरहरिणी तू माझे मृगजळ व्हावे
तू आन्तर मम असतांना मी तुझ्यात आणि वसावे

मी अर्धरात्रीचा सविता तू पूर्णसूर्य प्रकाशावे
मी अर्धमुर्धसे जगणे तू पूर्णविरामा यावे

तू विश्वरूप दर्शावे मी पार्थ श्रीकृष्ण व्हावे
तू स्वहस्ते मारावे मी कंस होऊनी यावे 

मी आणि काय करावे मी आणि काय लिहावे
तू सोडून तोडून जाणे श्वासांतून जगणे जावे.
                                                         -कौमुदी.


शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

जर.....

हळदुलं कुंकू तुझ्या नावे लावलं असतं.
नवा पदर धरून हाती कोरभर लाजले असते.
भिजलेल्या श्रावणात
प्राजक्ताचा अब्दागीर
पाठवणी परतणी
सजलेली मंगळागौर
झिम्मा फुगडी सारे खेळ
खेळून दमले असते.
मिटले असते तुझ्या कुशीत
अंकुरात उमलले असते.
सजली वेल पाहिली असती,
चिमणा चिमणीचं धडकं घरट
भांड्याला भांडं लागून
चहाच्या पेल्यात वादळ हरतं.
जाऊन येऊन ऊन पाऊस
आपली छपरं पिकली असती.
दमा खोकला डायबेटीस
थोडी बायपासही सांभाळली असती.
खाल्ले असते चटके सोबत
पिकली पानं गळली असती.
कित्ती छान झालं असतं .......
........जर तुला आसवं कळली असती.

                                             -कौमुदी.




ऑयस्टर

हवं ते घेऊ देत मला
परिघातून हात बाहेर काढून
आणि नको बाहेरची हवाही
शिंपल्यात आधारानं जगणारा
ऑयस्टर आहे मी!

Let the people fetch
the pearl made by me
मला मोती गेल्याचं दु:ख नाही
आणि ओझं केल्याचाही.....
लाजाळूचं झाड समाज वा
वारुळातला सर्प ...काहीही
नकोय स्पर्श कशाचाच
विषाचा दंश ...
फुत्कारही सोडायचा नाही.

Any way, तुला नाही कळणार ते
दगडाच्याही exhibitionची  fashion झालीये.

                                                        -कौमुदी.

THE CRUX IN CRUSIFICATION OF A GRIEF


Writing is the part of my life alike my thoughts. Thoughts are endless and effortless. I always try to reduce my thoughts into writing but it is not always possible just because thoughts are double-sided sword. When my own thoughts will kill me? ….. No Idea!! My readers may have the thought that why the caption of my articles is “THE CRUX IN CRUSIFICATION OF A GRIEF”.

The reason is that I am a very sentimental person. The first book I read in my childhood was “Shyamchi Aai” (Shyam’s Mother) in my mother tongue Marathi. It made my feelings towards human relationship. It gave me the sense of thinking by heart rather than brain. For me, the book played the role of pathfinder. It overgrew my heart, feelings and emotions. I was always thinking I’m very lucky and blessed that I’m not heartless. My eyes are full of tears and my heart is made with kindness, compassion and love for all. I’ve a sense of emotion in this ruthless cruel world. How lucky I’m!!!

            I was wounded many a time. I’d distributed roses and what I’d achieved?  Crown of thorns.!? The people in my circle of affection never returned to me with the same thing. Does the person who love always has the responsibility to love and not the right to be loved? I was always thinking. In certain situations, if I changed my behavior, their behavior towards me always had a change. They never thought why I behaved so and left me alone with wounded heart. Why did my relatives friends not paid attention on my emotional want? I went on thinking. Why this happened to me? Was I wrong in asking their attention in my difficult and sorrowful days? Wasn’t I precious for them? Was there any basic fault in my behavior? Why? This ‘why’ trodden me a lot.

I went on thinking for the answer of my question. I thought ‘In this merciless world ‘who cares’ for the emotions? I’m wrong. I was wrong in choosing my ideal personality. “Sane Guruji” the writer of the book “Shyamchi Aai” was wrong. Why love others if they don’t respond rather they don’t love you? My eyes filled with tears and the heart with anger. I strongly decided ‘Now I’ll hurt the world. I’ll teach a lesson to all of them who hurt me. And I actually tried it. When at first I hurt my trees to reduce my thoughts in an action plucked it’s leaves, blossom and tried to cut it off. As I went on doing it tears were falling down from my eyes. My heart filled with the feeling of self hatred ness. I realized that I was hurting my own and I will do the same if I hurt anybody anymore. (That much I loved everybody in my circle of affection) I left my act and was crying. I did not realize what time I slept. Next day morning I arose and what I saw?! The flowers of the trees which remained unscratched were blooming, laughing with the air. They hadn’t any sense of my hard heartedness. They were enjoying their morning with what they had. Again there were tears in my eyes. No need of words. I got my answer.

            Now I realize better my nature. Neither my heart was wrong nor my idol. If there was anything wrong that was my attitude towards the feelings. We all do the same mistake. Relations do not create on give and take policy. How can we forget this? If we love anybody it is for ourselves and it we hate this is also for our own parameters. We all love the only person and that is “I”. “I” is the only cause of happiness and all kind of sadness also. This is the only grief. And the highest madness is that we can not forget this grief. We all want to get rid of it and we can’t so I thought it is the crucial point in the progress towards happiness. How can we forget “I” with “I” for “I”? This is the crucial point I felt and hence I started writing on “THE CRUX IN CRUSIFICATION OF A GRIEF”
            I don’t know how many of you agree on this rather read this for being agree.
            Again as I wrote I don’t care. I’m done with my work.

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

तू यावे म्हणुनी .......

         माझ्या ऑफिसला जाण्यायेण्याच्या रस्त्यावर स्मशान आहे.आज सकाळी सकाळी तिथे एक चिता धडधडत होती. कोण गेलं होतं, स्त्री कि पुरुष तरुण कि म्हातारा ठाऊक नाही. कधीचाच अग्नी दिलेला असावा सकाळच्या प्रशांत वेळी ज्वाळा चांगल्याच उंच होत्या. थकल्या भागल्या त्या जीवाला वन्ही आपल्या मांडीवर चिरविश्रांती देत होता. मृत्यू कवेत घेऊन निघाला होता निजधामाला. जळती चिता एकाकी सोडून गेलेल्या नातेवाईक, आप्तांची कणव आली आणि मृताच्या साठी समाधान... किती भाग्यशाली आहे हा माणूस! मृत्यूने आपल्या जवळ घेतले आहे याला....
          सकाळ सकाळ यमधर्माच्या पाऊलखुणा पाहून खरं तर सुखावले मी म्हणून हे सारे विचार माझ्या मनात आले. तुम्ही म्हणाल अमंगळाचे दर्शन झाल्यावर कसले सुख होते कुणास ठाऊक? मला सुख आहे ते मृत्यूचे अस्तित्व जाणवून. (कुणाच्या मृत्यूचे सुख वाटावे इतकी निर्मम नाहीये हो मी) मृत्यूचे फार फार आकर्षण आहे मला... कवी म्हणून कल्पना म्हणून नव्हे... माणूस म्हणून. (जीवन दु:खी आहे असेही नव्हे)प्रेयसीला प्रेयासाचे असते तितके आणि  तसे आकर्षण आहे... ओढ आहे... वाटले तर प्रेम आहे...
           एक खूप खूप गोड स्वप्न आहे माझे...'एक सुंदर ओटी, ओवऱ्या आणि मागचे पुढचे मोकळे झाडामाडांनी डवरलेले आंगण असलेले कौलारू घर असावे. दाराच्या पायथ्याशी पहाटेपहाटे प्राजक्त सुगंधाच्या चवऱ्या ढाळत असावा... पहाटवारे मंद वाहत असावे... मखमली गवतावरल्या दवात पाय भिजवत मी धुंद गिरक्या घ्याव्या आणि तोल जाऊन पडण्याच्या आत अगदी अलगत झेलून वारयावर स्वार व्हावा माझा मृत्यू ......'
         आणखीही वाटतं की वाघासारखा रुबाबदार आणि राजेशाही असावा माझा मृत्यू ....तस्साच हिंस्त्र.... सोनाळ्या उन्हात लखलखता देह घेऊन रुबाबात चालणाऱ्या वाघुल्यापेक्षा नखं परजणारा पेटल्या डोळ्यांचा शिकारी वाघ लै म्हंजे लैच आवडतो मला. त्याची भीती वाटत नाही असं नाही...ती वाटतेच पण प्रेम जास्त वाटतं....
        भो मृत्यू, कसाही ये. कोमल वा विकराळ.... तुझी दोनही रूपं भारी आवडतात मला... मी खूप मणजे खूप आसुसून वाट पाहते आहे तुझी....
         कॉलेजच्या १ल्या २या वर्षी आमचे सचिन प्रवीण म्हणायचे," कौमुदी तुझ्या डोळ्यात वाट दिसते गं" ..तेव्हा हे सांगताच येत  नव्हतं मला ... सुरवातीचं अपयश पाहून डिप्रेशन आलंय म्हणाले असते सारे .. आताही काही खूप यश पाहिलंय असं नव्हे ...अवघड वाटा सोप्या वाटतायेत इतकंच. पण म्हणून वाटत असलेली आंतरिक ओढ कमी झालीये असं मुळीच नाही ....दिवसागणिक ती आपली वाढतेच आहे एव्हढे मात्र खरं. सरणारा एकेक दिवस मला जणू मैलाचं अंतर कपात माझ्या हृदिस्थाकडे घेऊन जातोय असं वाटतं.....त्याची ओढ आहे म्हणूनच जगण्याचा एकेक क्षण enjoy करते मी....मुक्त मुक्त होऊन भेटायचे म्हणून ज्या क्षणी ज्या वेगाने जागून घेता येते ते घेते. तुकोबा म्हणतात  ते  खरेच  खरे  आहे  "मरणाचे  स्मरण  असावे" ....
खरेच  असावे ...
तू  यावे  म्हणुनी
पायघड्या  जगण्याच्या
नाही  मागे  उरणे
सोस  पुरव  सारण्याचा
डोळे  निवून  जाती
उशीर  तुझ्या  दिसण्याचा
चेतवला  तू  वन्ही
हा  गुन्हा  का  पतंगाचा
वर्णनाने  भारावले  आहे हे  खरेच  पण  त्याहूनही  काळाच्या  दूर  असण्याने  भारावले  आहे....  Thee Godess of death come soon....I'm waiting for you....


सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

धावा


मी रंगले समाधीत
तू अंतरी उमलशी राजा
तुजपाशी सारी गुपिते
गुपितांचा गाजावाजा

तुजसाठी रोजच चाले
जगण्याचा आटापिटा
तुजपयी पांडूरंगा
माझ्या मर्तिकाच्या विटा

जळो जावो दु :ख सारे
सुखे अंतरी जळेन
थंड चंदन जळते
जरा इथे आकळेल

नको डोळ्यात आसवे
आसवांत ओघळशी
का रे मला तू जाळतो
का तू माझ्यात जळशी

जळो जावो मारो सारे
असे जळणे तळणे
पुरे झाले बरे आता
असे छळून छळणे

उभी काळसर्पयोगे
पुरे मरण पासंगा
प्राण जाई डोळ्यांतून
आता यावे पांडुरंगा
-कौमुदी(५ ऑग. २०११)


शून्य


या शून्यापासून
त्या शून्यापर्यंत
अखंड प्रवास...
बदलाचा
उन्नतीचा
उत्थानाचा ध्यास...

शून्य....पूर्ण सत्य .
चकचकीत मिथ्याला
गिळून बसलेले
ना सरले..
ना उरले..
अखंड पसरलेले ....

किमपि न अंतर
चिरकालीन
निरंतराचा वास
हे शून्य ...ते
ते शून्य .....
किती मोठा प्रवास
                    -कौमुदी (April 2010)

जोगिया


जरी जोगिया तू | सोडला संसार
तरी त्याचा भार | तुला आकळला ||

नि:संग होऊन | धरिला तू पार
मायेची पाखर | परि आठवते ||

सागराच्या आत | जशी खळबळ
तुझी चुळबूळ | तशी रे चालली ||

परि तू न जाशी | परतुनी देवा
वाटे तुझा हेवा | सदैवची ||
                              -कौमुदी (२००८)



मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०११

विरहिणी

दवबिंदुंचे सिंचन घेऊन ...
हिरवे गर्द अवगुं
न लेऊन ...
सजलेली मी!
अभ्राच्छादित तुझ्या मुखाचे चुंबन घेते
शतजन्मांची तान्हेली मी
... तुज सखया रे ....
मम पीडेचे दर्शन देते....
गाते मी गीत तुझ्या प्रीतीचे
तव
तृप्तीचे बीज उरी साठवते
अंकुरते मी तुझिया अस्तित्वातून
मी सखया रे तव प्रीतीतच न्हाते

... स्पर्श तुझा हिरवा हिरवा
मम काया नीलकांती होते
हरवून धुक्यात निळाई
आंतरी अस्तित्व तुझे शोधते
तव प्रेमदिठीला पारखीच
हि विरहिणी झुरते
हृदयंगम लेऊन पिवळा शेला
तव क्रोधकटाक्षी जळते 

हे तप्त तापसा हि

प्रेम तपस्या स्वीकारुनिया घे रे
मी पृथ्वी तव आंतरभावी
तू मम प्रेमाम्बर हो रे !!!
                             -कौमुदी